वेश्या व्यवसाय प्रकरणी चौथ्या संशयिताला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक नगरमधील एका इमारतीत वेश्या व्यवसाय प्रकरणातील चौथ्या संशयिताला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. समीर मंगेश लिंबुकर (२३, मूळ रा. देवरूख, सध्या रा. आरोग्यमंदिर, रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या चौथ्या संशयिताचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सिद्धिविनायकनगर येथे छापा टाकून राजेंद्र रमाकांत चव्हाण (४५) याला अटक केली होती. त्या वेळी बिहार आणि ठाणे येथील दोन तरुणींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान राजेंद्र चव्हाणच्या मोबाईल सीडीआरद्वारे अब्दुल हसनमियाँ डोंगरकर आणि ओमकार जगदीश बोरकर या दोघांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत चवथा संशयित समीर लिंबूकरचे नाव पुढे आले असता पोलिसांनी त्यालाही बुधवारी अटक केली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.