Thursday, November 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

मंडणगड सडे जाधववाडी येथील घटना

मंडणगड:- तालुक्यातील सडे जाधववाडी येथे भाताची राखण करत बसलेल्या एका ६४ वर्षीय वृद्धाला ‘माझ्या कुत्र्याला का मारले’ असा जाब विचारत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृद्धाच्या डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत करण्यात आली असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडे जाधववाडी येथील रहिवासी दत्ताराम परशुराम जाधव (वय ६४) हे गावातील बंद असलेल्या अंगणवाडीच्या आवारात त्यांचे साडू दिनकर सिताराम पवार यांच्या कापलेल्या भाताच्या पिकाची राखण करत बसले होते. सोमवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच वाडीतील अल्पेश सोपान जाधव हा तिथे आला. त्याने फिर्यादी दत्ताराम जाधव यांना ‘तू माझ्या कुत्र्याला का मारलेस?’ अशी विचारणा करत थेट वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील बाचाबाची वाढल्यानंतर वाडीतील समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव हे दोघेही त्या ठिकाणी धावून आले.

या तिघांनी मिळून प्रथम दत्ताराम जाधव यांना जोरदार धक्काबुक्की केली. त्यानंतर अल्पेश जाधव याने हातातील लाकडी काठीने दत्ताराम यांच्या डोक्यावर कपाळाच्या वरील बाजूस जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दत्ताराम जाधव गंभीर जखमी झाले. त्याच वेळी समाधान जाधव आणि सोपान जाधव यांनी त्यांना हाताच्या ठोशांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

हल्ल्यात जखमी झालेल्या दत्ताराम जाधव यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. याप्रकरणी अल्पेश सोपान जाधव, समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये (गु.र.नं. १२८/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.