Tuesday, July 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वृद्धाच्या डोळ्यात मसाला टाकून ३ तोळ्यांची सोन्याची चैन लंपास

वृद्धाच्या डोळ्यात मसाला टाकून ३ तोळ्यांची सोन्याची चैन लंपास

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोभे-वेत्ये रस्त्यावर भरदिवसा एक धक्कादायक लुटीची घटना घडली आहे. शेताकडे पायी जाणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाच्या अंगावर आणि डोळ्यात अज्ञात चोरट्याने मसाला पावडर टाकून, त्यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीची ३ तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना सोमवार, २५ मे रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी चंद्रकांत गोपाळ नार्वेकर (वय ७२, रा. आडीवरे कोभे, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी चंद्रकांत नार्वेकर हे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोभे येथील राहत्या घरातून शेतातील रातांबे (कोकम) सुकत घालण्यासाठी वेत्ये रोडने चालत निघाले होते. रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या कच्च्या रस्त्याने चढ चढून ते शेताकडे जात असताना त्यांना तीव्र धाप लागली. त्यामुळे ते विश्रांतीसाठी तेथेच असलेल्या एका वडाच्या झाडाखाली बसले.

ते झाडाखाली बसलेले असतानाच, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात इसमाने अचानक त्यांच्या अंगावर मसाला पावडर टाकली. डोळ्यांत आणि अंगावर मसाला पडल्याने नार्वेकर यांना काही समजण्याच्या आतच, त्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १,८०,०००/- रुपये किमतीची, ३ तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतली.
साथीदारासह मोटारसायकलवरून पोबारा
चैन हिसकावून घेतल्यानंतर सदर अज्ञात चोरटा तिथेच दबा धरून बसलेल्या आपल्या दुसऱ्या साथीदारासह मोटारसायकलवर बसून वेगाने पळून गेला. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर चंद्रकांत नार्वेकर यांनी रात्री ९:१७ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गु.र.नं. ६४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०४(२) आणि ३(५) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नसून, राजापूर पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.