वृद्धाच्या गळ्यातील चैन लांबवली; महिले विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- नातीच्या संगोपनासाठी मुलगी बघून देते असा बहाणा करून वृद्धाला घरात बोलवून त्याच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हातचलाखी करून चोरल्या प्रकरणी धनजी नाका परिसरातील महिलेविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  पांडुरंग यशवंत सावंत (वय -58 वर्ष  रा . गणेशकृपा अपार्टमेंट तांबट आळी रत्नागिरी )  यांनी त्याबाबतची तक्रार दिली आहे. पांडुरंग सावंत यांची मुलगी सरकारी नोकरीत असून नातीच्या संगोपनासाठी एका मुलीची अथवा महिलेची गरज असल्याने ते ओळीतील लोकांना नेहमी त्याबाबत सांगत असत. .२ फेब्रुवारी रोजी  सकाळी 10 वा चे सुमारास भाजी घेण्याकरीता धनजी नाका रत्नागिरी येथे पांडुरंग सावंत गेले होते. त्यावेळी  त्यांच्या  ओळखीची सुरय्या हकीम त्यांना धनजी नाका परिसरात दिसली.    नातीचे संगोपन करण्याकरीता एक मुलगी अथवा बाई पाहीजे आहे असे त्यांनी सुरय्या यांना सांगितले.  त्यावेळी सुरय्या हीने मला मी बाई किंवा मुलगी बघुन देते असे सांगुन ती निघुन गेली . त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी  १ वाजण्याच्या सुमारास सावंत हे  मासे घेण्याकरीता मच्छीमार्केटकडे जात असताना सुरय्या ही  धनजी नाका येथे वडाचा पार येथे दिसली तेव्हा तिने त्यांना आवाज देवुन घरी बोलावले. त्यावेळी सुरय्या त्यांच्यासोबत बोलत असताना   बोलता – बोलता सावंत यांच्या  शर्टाच्या कॉलरवर मस्करीत हात मारुन मी तुम्हाला मुलगी किंवा बाई बघुन देते तुम्ही आता घरी जा असे सुरय्या हिने सांगितले. 

दुपारी जेवत असताना पांडुरंग सावंत यांच्या पत्नीने गळ्यातली चैन कुठे आहे अशी विचारणा केली त्यावेळी सावंत यांनी गळ्याभोवती हात फिरवुन गळ्यात चैन आहे का याची खात्री केली. गळ्यात चैन नसल्याचे समजताच सावंत हे चांगलेच भांबावून गेले होते. त्यांनी  घरात  शोधाशोध केली मात्र चैन मिळून आली नाही.  मासे घेण्यासाठी मच्छीमार्केट येथे जात असताना सुरय्या हकीम नावाची महीला (वय सुमारे 40 वर्ष रा.धनजी नाका . वडाचा पार, रत्नागिरी ) हिने  बोलण्यामध्ये गुंग करुन बोलता बोलता शर्टच्या कॉलरवर हात मारुन  गळ्यातील  सोन्याची चैन हात चलाखीने चोरी केल्याच्या संशयावरून  सावंत यांनी सुरय्या विरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सुरय्या नामक संशयित महिले विरोधात भा. द.वि.क ३७९  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.