वीज चोरी प्रकरणी खेडमध्ये गुन्हा दाखल

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दीड लाख रुपये किंमतीच्या वीज बिलाची थकबाकी ठेवून वीज चोरी केल्याप्रकरणी मधुकर कृष्णा साळुंखे या व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी निखिल बेडेकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, ही घटना २७ मार्च २०२४ रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. वीज चोरीच्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मधुकर साळुंखे हा भरणे आठवडा बाजार परिसरात वास्तव्यास होता. त्याने दीड लाख रुपयांचे वीज बिल थकवले आणि वीज बिलाची रक्कम न भरता विजेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महावितरणने भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात १२ मार्च २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्यात ई-तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना तक्रार देण्यासाठी पत्र पाठवले होते. मंगळवारी, निखिल बेडेकर यांनी पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार नोंदवली, ज्यानंतर मधुकर साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्यात काही अडथळे आले होते. संबंधित अधिकारी सातारा येथे बदली झाल्याने तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. मात्र, पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर महावितरणचे अधिकारी निखिल बेडेकर यांनी तक्रार नोंदवली आणि प्रकरणाला गती मिळाली. महावितरणने वीज चोरीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.