दापोली:- दापोली येथे सक्शन पंपाद्वारे अनधिकृतरित्या होत असलेल्या वाळू व्यवसायाविरोधात तक्रार केल्याबद्दल येथील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते जहुर अलिमिया कोंडविलकर यांनाच वाळू माफियाकडून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत कोंडविलकर यांनी दापोली पोलिस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दापोली तालुक्यात ओळखला जातो. अडखळ गावच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू उत्खनन चालते. याबाबत वेळोवेळी शासन दरबारी चोरटी वाळू होत असल्याची तक्रार दिली आहे. याचा मनात राग धरून चोरटी वाळू उत्खनन करणाऱ्या अडखळ गावातील रियान युनस वाकणकर याने बायपासजवळ भर रस्त्यात अडवून मला शिवीगाळ करून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असता कोंडविलकर यांनी स्वतःचा बचाव केला. तो वेळोवेळी ठार मारण्याच्या धमक्या देत असतो असे तक्रार अर्जात म्हंटले आहे.
दिनांक १२ जून रोजी संध्याकाळी वाकणकर दबा धरून बसला होता. ठार मारण्याचे हेतूने अंगावर येवून कोंडविलकर याना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना तक्रारी करतोस ना तुझा आम्ही गेम केल्याशिवाय राहणार नाही, अशीही धमकी दिली. आमचा हात वरीष्ठपर्यंत आहे. वाळू माफिया आम्ही असल्यामुळे सर्व यंत्रणा आमच्याजवळ येण्यासाठी घाबरतात. तू कोण आहेस ? अशा उददेशून बोलत होता. त्या ठिकाणी काही अनोळखी लोकानी येवून कोंडविलकर याना त्यांच्या तावडीतून सोडवले.
कोंडविलकर यांनी पुढे तक्रारीत म्हंटले आहे की, माझ्या जिवाला रियान वाकणकर व इतर वाळू माफिया पासून मोठा धोका निर्माण झाला आहे. रियान वाकणकर हा जोगा नदिमध्ये दिवस रात्र चोरटी वाळू सक्शन पंपाच्या माध्यमातून काढत असल्यामुळे मी आवाज उठवत असल्याने माझा गेम करण्याच्या तयारीत वाळू माफिया आहेत असे म्हंटले आहे. याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी आणि पोलीस संरक्षण मिळावे असे जहुर अलिमिया कोंडविलकर यांनी तक्रार अर्जात म्हंटले आहे.