वादळी वार्‍यांचा मासेमारीत अडथळा; शेकडो नौका बंदरांच्या आश्रयाला

रत्नागिरी:- गेले दोन दिवस जिल्ह्यात वेगवान वारे वाहू लागल्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. गिलनेटद्वारे मासेमारी करणार्‍यांनी नौका बंदरातच उभ्या केल्या असून काही ट्रॉलर्स्वाल्यांनी धोका पत्करला; परंतु त्यांच्या हाती मासळी लागणे अशक्य असल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.

राज्यात पुन्हा थंडीचा तीव्र प्रभाव जाणवणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. जमिनी लगतचे वारे पूर्व दिशेने वाहत असून, ते उत्तरेकडून वळून राज्यात येत आहेत. त्यामुळे थंड व कोरडे वारे वाहण्याची शक्यता आहे. या वार्‍याची तीव्रता अधिक असल्यामुळे वातावरणातील गारठा वाढू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी (ता. 27) सायंकाळपासून वारे वाहू लागले आहेत. रात्री वार्‍याचा वेग वाढला. शुक्रवारी दिवसभर वातावरण जैसे थेच आहे. त्याचा परिणाम मच्छीमारीवर झाला आहे. समुद्राच्या पाण्याला करंट असल्यामुळे गुरुवारपासून गिलनेटद्वारे मासेमारी करणार्‍या मच्छीमारी नौका बंदरातच उभ्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये किनारी भागात मासळी मिळत नसल्याने हे मच्छीमार अडचणीत सापडले आहे. परराज्यातील फास्टर नौकांनी केलेल्या मासेमारीचा हा परिणाम असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही परिस्थिती अजून काही दिवस राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. पाण्याला करंट असल्यामुळे ट्रॉलिंगने मासेमारी करणार्‍या काही नौकाही बंदरातच आहेत. एखाद दुसरी नौका धोका पत्करुन समुद्रात रवाना झाली. पाणी हलत असल्याने त्यांना मासळी मिळेलच असे नाही. त्याचा फटका मच्छीमारांना बसणार आहे.

वेगवान वार्‍याचा फायदा हापूसच्या कलमांना झाला आहे. सुखलेला मोहोर वार्‍यामुळे गळून गेला आहे. मात्र थंडीचा जोर वाढत असल्याने मोहोर येत आहे. परिणामी पहिली कैरी गळून जात आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.