Wednesday, September 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांसह व्यापारी अडचणीत

वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांसह व्यापारी अडचणीत

जिल्ह्यातील उद्योजक, हॉटेल व्यावसायिक आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

रत्नागिरी-: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून रोजी दिलेल्या पुनरावलोकन आदेशाबाबत अ. भा. अक्षय ऊर्जा संघटना रत्नागिरी जिल्ह्यातील लहान-मोठ्या उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या आदेशामुळे वीज दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे हॉटेल उद्योग, रुग्णालये, सूक्ष्म, लघु उद्योग, उत्पादन कारखाने यांना मोठा धोका पोहोचणार आहे. त्यामुळे हा आदेश मागे घेण्याकरिता जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांतर्फे उद्या दि. ८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

निवेदन देण्याकरिता अ. भा. अक्षय ऊर्जा संघटना जिल्हा शाखा, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, उत्तर रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशन, चिपळूण, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशन एकत्र येणार आहेत.

आयोगाच्या पुनरावलोकन आदेशामुळे विविध प्रकारचे उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक कमी होऊ शकते, अक्षय ऊर्जा क्षेत्राला फटका बसू शकतो आणि महाराष्ट्रातील व्यवसायाचे वातावरण बिघडू शकते. हे निवेदन देण्याकरिता उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी उद्या एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.

आयोगाने २५ जून २०२५ चा आदेश तात्काळ रद्द करावा. २८ मार्च २०२५ चा आदेश पुन्हा लागू करावा. आयोगाने सार्वजनिक व औद्योगिक प्रतिनिधींची नियुक्ती करावी. सौर बँकिंग आणि नेट मीटरिंग पुन्हा लागू करावेत. ओपन अ‍ॅक्सेस मंजुरीची प्रक्रिया सुलभ करावी अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

नवीन दरपत्रकामुळे वीजदर १० टक्क्यांनी कमी होतील. मात्र, प्रत्यक्षात भरमसाठ वाढणार आहेत. जुलै २०२५ ची वीजबिले मार्च २०२५ च्या तुलनेत लक्षणीय वाढ दाखवतात. हे निर्णय कोणत्याही सार्वजनिक सल्लामसलतीशिवाय एकतर्फीपणे घेतले गेले आहेत. याला संघटनेचा विरोध आहे.

१ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या बहुवर्षीय दरपत्रक प्रस्तावावर हरकती मागवल्या होत्या. हजारो प्रतिसाद आल्यामुळे आयोगाची वेबसाइट क्रॅश झाली होती. सार्वजनिक सुनावणीत महावितरणच्या प्रस्तावातील त्रुटी समोर आल्या होत्या. आयोगाने २८ मार्च २०२५ रोजी दिलेला प्रारंभिक आदेश संतुलित होता. पण महावितरणने गणना चूक दाखवत स्थगितीची मागणी केली. मात्र आयोगाने कोणतीही माहिती न देता विना सार्वजनिक संवाद २५ जून रोजी एकतर्फीपणे आदेश दिला आहे.

वाढीव वीज दरामुळे उत्पादन बंद होणे, स्थलांतर आणि कार्यक्षमतेत घट होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या सौर वापरासाठी बॅंकिंग हटवली गेली असून, ग्रिड सपोर्ट चार्ज सौर उत्पादनावर लावण्यात आले आहेत. त्यामुळे सौर प्रकल्प परवडणार नाहीत. राज्य सरकारच्या प्रोत्साहनावर सौर प्रकल्प बसवलेल्या उद्योगांचे गुंतवणूक अडकली आहे. याविरोधात संघटना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन म्हणणे मांडणार आहे.

स्थिर आकार, वीज आकार आणि वहन आकार यांचा एकत्रित विचार केल्यास ही औद्योगिक दरवाढ भरमसाठ आहे. २० केडब्ल्यूपर्यंतच्या एल. टी ग्राहकांसाठीसाठी ३०.६६%, २० के.डब्ल्यूवरील ग्राहकांसाठी २८.१९%, एच.टी ग्राहकांसाठी ३६.४३% आणि हंगामी एच टी ग्राहकांसाठी ३३.६१ % एवढी दरवाढ आहे. परिणामी महाराष्ट्रात उत्पादित झालेल्या मालाची किंमत वाढून तुलनेने त्याच उत्पादनाची इतर राज्यातील किंमत कमी राहिल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग अधिक अडचणीत येतील.