वाढलेल्या थंडीने आंबा, काजूला फायद्यासह तोटा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात तापमान थेट 20 ते 22 अंश सेल्सियसपर्यंत घसरल्यामुळे जिल्ह्यात थंडीची हुुडहुडी वाढली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात ही स्थिती आहे. थंडी वाढल्यामुळे आंबा, काजूला एकीकडे फायदा व तोटाही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीला प्रारंभ होतो. साधारण जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा प्रभाव असतो; परंतु या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्यापर्यंत पाऊसच होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये तीन-चार दिवस काहीअंशी थंडी जाणवली. जानेवारीत सुरूवातीचे एक दोन दिवस वगळता वातावरणात मोठे फेरबदल झाले. त्यामुळे थंडीऐवजी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या वर्षी थंडीअभावी आंबा, काजूला अपेक्षित पालवी, मोहोर आला नाही. आंबा, काजूचा हंगाम देखील तीन टप्प्यात विभागाला गेला आहे. त्यामुळे थंडी नसल्याचा मोठा तोटा आंबा, काजू बागायतदारांना बसला आहे.
उत्तरेकडील थंड वारे आता कोकण किनारपट्टी भागात प्रवाही झाले आहेत. त्याचा परिणाम रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील जाणवण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी पहाटे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सरासरी 16 अंश तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी 18 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.
जिल्ह्यातील गारठा वाढला आहे. थंडी आणखी चार ते पाच दिवस टिकून राहिल्यास ज्या झाडांना मोहोर आलेला नाही, त्यांना मोहोर येण्याची शक्यता आहे; मात्र कमाल आणि किमान तापमानातील फरकामुळे आंबा, काजूवर कीडरोगांचा प्रादुर्भाव देखील वाढण्याची भीती बागायतदारांत आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडी होती. मात्र त्यानंतर थंडी गायबच झाली होती.