लांजात सागवान तस्करीचा पर्दाफाश; ११ संशयित ताब्यात, ५ वाहने जप्त

कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाई

लांजा:- लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवान वृक्षांची अवैध तोड आणि तस्करी करणाऱ्या एका आंतरजिल्हा रॅकेटचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आतापर्यंत ११ संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, सागवान वाहतुकीसाठी वापरलेली २ क्रेन, १ ट्रक आणि २ बोलेरो पिकअप अशी तब्बल पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सागवान लाकडाची शासकीय दरानुसार किंमत २ लाख १२ हजार ७० रुपये असून, वाहनांसह संपूर्ण मुद्देमालाची किंमत ८१ लाख रुपये असल्याची महत्त्वपूर्ण माहिती वन विभागाने दिली आहे.

दिनांक ३० ऑक्टोबर रोजी लांजा वनक्षेत्रात गस्त घालत असताना वनपाल आणि वनरक्षक यांना जंगल सर्व्हे नं. १९१/१ या राखीव वनक्षेत्रात साग जातीची सात झाडे अवैधपणे चोरल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेनंतर भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार प्रथम गुन्हा क्र. C०३/२०२५ नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात दि. २४ सप्टेंबर रोजी वन विभागाने मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर यांसह एकूण सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एमएच ०९ जीएम ०५५२ क्रमांकाची क्रेन व ७.४९५ घनमीटर साग इमारती माल जप्त करण्यात आला होता.

दिनांक २६ सप्टेंबर रोजी तपास पथकाने अधिक तपास करत आणखी चार संशयित आरोपींना, ज्यात संजय शांताराम गुरव (रा. खारेपाटण), श्रेयस गोपाळ बारस्कर यांचा समावेश आहे, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान श्रेयस गोपाळ बारस्कर याने साग इमारती माल उतरवण्यासाठी व भरण्यासाठी वापरलेली एमएच ०८ बीई ४१८५ क्रमांकाची क्रेन आणि एमएच ०८ बीसी २००५ क्रमांकाची बोलेरो पिकअप मौजे रानतळे येथील वनपाल निवासस्थानी आणून दिली. तसेच, संजय शांताराम गुरव याने साग इमारती माल रात्री ट्रक भरून घेऊन जाण्यासाठी वापरलेला एमएच ०८ डब्ल्यू ८४२४ क्रमांकाचा ट्रक राजापूर वनपरिमंडल कार्यालयात हजर केला. याचबरोबर मंदार मनमोहन बारस्कर याने मजुरांना कुर्णे येथे सोडण्यासाठी वापरलेली एमएच ०८ एपी ८५८४ क्रमांकाची बोलेरो पिकअप देखील वन विभागाकडे सुपूर्द केली.

या कारवाईमुळे सागवान तस्करीसाठी वापरण्यात आलेली २ क्रेन, १ ट्रक, २ बोलेरो पिकअप अशी एकूण पाच वाहने जप्त झाली आहेत. याशिवाय, आज अखेरपर्यंत एकूण ५४ नग (३.०२४ घन मीटर) इमारती साग मालही जप्त करण्यात आला आहे. एकूण साग इमारती नगांची शासकीय दरानुसार किंमत २,१२,०७० रुपये असून, हा साग माल व वाहने (किंमत ८१,००,०००/-) वनरक्षक राजापूर यांच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

सध्या या गुन्ह्याचा तपास मा. मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर श्री. गुरुप्रसाद सर, मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरिजा देसाई आणि मा. सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक रत्नागिरी श्री. जितेंद्र गुजले, लांजा आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, तसेच अनेक वनपाल आणि वनरक्षक यांनी ही कारवाई यशस्वी केली. सदर गुन्ह्यात आणखी वाहने आणि साधनसामग्री समाविष्ट असण्याची शक्यता असल्याने पुढील तपास चालू असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. वन्यजीव किंवा अशा घटनांची माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनअधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.