लांजा:- अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावर कोर्ले येथे घडली आहे. ही माहीती पोलीस पाटील अल्ली साटविलकर यांनी लांजा वनपाल दिलीप आरेकर यांना दूरध्वनीवरुन दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता सुनील मनोहर जोशी (रा.कोर्ले) यांच्या काजू बागेजवळ बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला.
बिबट्याच्या मागील बाजूस वाहनाचा जोराचा धक्का लागल्याने रस्त्यावर घासून मागील पायांच्या मध्ये जखम झाली होती. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मणक्यापासून मोडलेल्या अवस्थेत असलेल्या बिबट्याला मृत घोषीत केले. ही घटना शुक्रवार दि.५ मे रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला.