लांजा:- लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर किरकोळ वादातून कोयत्याने वार करून त्याला जखमी केल्याची घटना तालुक्यातील कुर्णे पडयेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश रामचंद्र पडये (वय ४६, राहणार कुर्णे पडयेवाडी) याची घटस्फोटीत मुलगी आहे. या मुली बरोबर लग्न करण्यासाठी फिर्यादी राजेश एकनाथ चव्हाण ( वय ४०, राहणार गवाणे तालुका लांजा) इच्छुक होता. यासाठी राजेश चव्हाण आणि सुरेश पडये या दोघांमध्ये बोलणी सुरू होती. तसेच या संदर्भात ४ ऑगस्ट रोजी लग्नासंदर्भात बोलणेदेखील झाले होते. लग्न करण्याचे देखील ठरवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी ७ ऑगस्ट रोजी राजेश चव्हाण हा सुरेश पडये यांच्या कुर्णे येथे घरी पुन्हा एकदा लग्न संदर्भात बोलणे करण्यासाठी दुपारी गेला होता. हे बोलणे सुरू असतानाच दोघांमध्ये किरकोळ स्वरूपात वाद झाले.
मात्र या वादातून सुरेश पडये याने आपल्या घरातील कोयती आणून राजेश चव्हाण याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये राजेश याला पाच टाके पडले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या राजेश चव्हाण याने ७ ऑगस्ट रोजी रात्री १०.४४ वाजता लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
राजेश चव्हाण याने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेश पडये याच्यावर भा.द.वि. कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एन. एस. नावलेकर करत आहेत.