लांजा ग्रामीण रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
लांजा:- रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी प्रवाशाचा लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी घडली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, अद्याप त्याचे नाव आणि गाव समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड पथकात कार्यरत असलेल्या दिव्यांका दिनेश गोधळी (वय ३१, सनद क्र. १७३४) या महिला होमगार्ड आडवली रेल्वे स्टेशन येथे सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर होत्या. कर्तव्य बजावत असताना त्यांना आडवली रेल्वे स्टेशन ते येरवली रेल्वे स्टेशन दरम्यान किलोमीटर क्रमांक २३७/२८ येथे एक अनोळखी पुरुष प्रवाशी वेरवली एक्सप्रेस क्रमांक १६३३४ मधून पडून जखमी झाल्याची माहिती मिळाली.
गंभीर जखमी झालेल्या या प्रवाशाला तात्काळ उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ५.४५ वाजता त्याला रुग्णालयात आणले गेले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्या प्रवाशाला मृत घोषित केले.
या घटनेची खबर महिला होमगार्ड दिव्यांका गोधळी यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी एएमयू. क्रमांक ६०/२०२५, भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वेतून पडून झालेल्या या अपघातामुळे आणि अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे आणि घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम लांजा पोलीस करत आहेत.