उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर घडली घटना
खेड:- खेड तालुक्यातील उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पांडुरंग सिताराम भुवड (रा. वावे तर्फे नातू, ता. खेड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास उधळे रेल्वे ट्रॅकवर घडली. पांडुरंग भुवड हे रेल्वे ट्रॅकवरून जात असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ‘हिस्सार एक्सप्रेस’ची त्यांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, यात पांडुरंग भुवड यांचा डावा हात आणि डावा पाय निकामी झाला, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता भा.ना.स.स. कलम ६०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर देणाऱ्यांच्या माहितीनुसार, रेल्वेच्या धडकेत झालेल्या या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.









