रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांची होणार दर्जोन्नती

रत्नागिरी:- कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून जाणार्‍या प्रमुख 37 कोकण रेल्वे स्थानकांना जोडणार्‍या रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे. सध्या हे रस्ते जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि कोकण रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात आहेत. दर्जोन्नती होऊन हे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग होऊन ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकक्षेत येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 आणि सिंधुदुर्गातील 4 रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. याचा संपूर्ण प्रकल्प अहवाल बनवला जात असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी सांगितले.

कोकण रेल्वेच्या स्थानकांकडे जाणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची आणि त्यांच्या वाहनांची ये-जा सुरू असते. कोकणातील पर्यटनही वाढीस लागले आहे. अशावेळी रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. यातील काही रस्ते जिल्हा परिषदेकडे असून, ते इतर जिल्हा मार्ग म्हणून ओळखले जातात. ग्रामपंचायतीचेसुद्धा रस्ते असून, ते ग्रामीण मार्ग म्हणून ओळखले जातात. रेल्वेच्या अखत्यारितही काही रस्ते आहेत. परंतु, या रस्त्यांच्या देखभालीसाठी शासनाच्या अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने अनेक रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रेल्वे स्थानकांवर उतरून आपापल्या इच्छित स्थळी जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांना या रस्त्यांचा फारच त्रास होतो. त्यामुळे त्याचा पर्यटनावरही दुष्परिणाम होण्याची भीती असते. हे रस्ते दर्जोन्नतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आल्यानंतर खराब किंवा नादुरूस्त होणार्‍या रस्त्यांची दुरूस्ती किंवा देखभाल वेळेत होऊ शकणार आहे. कारण त्यासंबंधी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्याचबरोबर या कामासाठी अंदाजपत्रकीय तरतूदही होऊ शकणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून जाणार्‍या एकूण 37 कोकण रेल्वे स्थानकांना जोडणारे रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जाणार आहेत. या कामांना गती मिळावी यासाठी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण लक्ष ठेवून स्वत: पाठपुरावा करत आहेत. पहिल्या टप्प्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील 5 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 प्रमुख रेल्वे स्थानकांजवळच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या 9 रेल्वे स्थानकांजवळचे रस्ते मोठ्या लांबीचे आहेत. त्याबाबतचा संपूर्ण प्रकल्प अहवाल बनवला जात आहे. या प्रकल्प अहवालानंतर संबंधित रस्त्यांची लांबी आणि त्यासाठी होणारा खर्च स्पष्ट होणार आहे. सिमेंट काँक्रीटच्या एका किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे एक कोटी रूपये खर्च अपेक्षित असतो. दर्जोन्नतीचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे गेले असल्याचे अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी सांगितले. त्यानंतर मुख्य अभियंता कार्यालयाकडून हे प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी जाणार आहेत.