राजापूरजवळ मोसम येथील घटना
पाचल:- राजापूर तालुक्यातील मोसम येथील रेल्वे बोगद्याजवळ रेल्वे रुळावर बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वे ट्रॅक क्रमांक २७१/१० ते २७१/२ दरम्यान ही घटना घडली.
मोसम-तावडेवाडीचे पोलिस पाटील उदय वासुदेव तावडे यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास राजापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित व्यक्ती धावत्या रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (क्र. ५२/२०२६) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. मयताचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून वर्ण सावळा आहे. केस काळे-पांढरे असून अंगात गुलाबी रंगाचा फुल शर्ट, पांढरी बनियन, पांढरी लुंगी व चॉकलेटी रंगाची हाफ अंडरवेअर आहे. डाव्या मनगटात काळ्या रंगाचे स्टेनलेस स्टीलचे घड्याळ आहे. या वर्णनावरून मृताची ओळख पटविण्यासाठी राजापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. माहिती असल्यास पोलिस निरीक्षक अमित यादव (९२७३९२६४२०), पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे (७३५००२८४८२), पोलिस हेडकॉन्स्टेबल रहीम मुजावर (७२७२८६६७८६) किंवा राजापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.









