जनआंदोलन छेडण्याचा इशारा
रत्नागिरी:- कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, २० मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ही सुनावणी रद्द न केल्यास ती उधळून लावण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पातून दरवर्षी ०.९ दशलक्ष टन बॉक्साईट उत्खनन करण्याचे नियोजन आहे. मात्र, या प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या मते, या उत्खननामुळे आंबा आणि काजू बागायतींचे मोठे नुकसान होईल, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
सर्वात मोठा धोका जल संकटाचा असून उत्खननामुळे नैसर्गिक जलस्रोत आटून भूजल पातळी घटण्याची शक्यता आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या देखील उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धुळीच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आणि त्वचेचे गंभीर आजार बळावू शकतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डोंगराळ भागात उत्खनन केल्यास पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असतानाही प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
”ज्याप्रमाणे एकजुटीच्या जोरावर रिफायनरी प्रकल्प रोखला, त्याच धर्तीवर हा बॉक्साईट प्रकल्पही रोखला जाईल,” असा ठाम निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. कोकणच्या निसर्गाचा बळी देणारा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आणि तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारले जाणार आहे. २० मे रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.









