‘रिव्हॉल्व्हर’ चा धाक दाखवून निलेश कीरकडून व्याजाची वसूली

चौकशीकरुन हत्यार कायद्याअंतर्गत कारवाई करणार: अधिक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी:- गरजूंना अल्प कर्ज देवून त्या बदल्यात त्यांच्याकडून लाखोंची मालमत्ता, पैसे हडप करणाऱ्या निलेश कीर यांचे अनेक किस्से बाहेर पडू लागले आहे. कर्ज वसूलीसाठी निलेश ‘रिव्हॉल्व्हर’ चा वापर करत असल्याची तक्रार पोलीसांकडे झाली आहे. त्यादृष्टीने पोलीसांनी ‘रिव्हॉल्व्हर’चा शोध सुरु केला आहे. निलेशकडे ‘रिव्हॉल्व्हर’चा परवाना आहे का? याची माहिती घेतली जात आहे.’रिव्हॉल्व्हर’ बेकायदेशीर आहे का ? याचा हि शोध घेतला जात आहे. त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

निलेश कीर हा मिर्या येथून सावकारी करत होता. यासाठी त्यांनी व्यक्ती वसूलीसाठी ठेवल्या होत्या. त्या व्यक्तीही कर्जदारांना व्याजाच्या पैशासाठी धमकावत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. निलेश कीर हा वसूलीसह वाहने ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरी शहरातील मोक्याच्या ठिकाणी बसून कर्जदारांना बोलवत असे. पैसे दिले नाही तर त्यांना थेट धमकी दिली जात होती अशी माहितीही पुढे आली आहे.
दामदुप्पट व्याजासाठी निलेश कीरने ‘रिव्हॉल्व्हर’चा धाक दाखविल्याची माहिती एका कर्जदाराने पोलीसांकडे केली आहे. त्यादृष्टीने पोलीसांनी तपास सुरु केला आहे. वसूलीसाठी किती कर्जदारांना निलेशने ‘रिव्हॉल्व्हर’चा धाक दाखविला होता. याचा शोध पोलीस घेत आहे. त्यामुळे निलेश कीर यांच्यावरील गुन्ह्यांमध्ये अधिकच वाढ होणार आहे.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सावकारी प्रकरणात विषेश लक्ष दिले आहे. पिडीत झालेल्या प्रत्येक कर्जदाराला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून पोलिस गुन्ह्याचा तपास करताना कर्जदाराना त्यांचे हक्क मिळवून देणार असल्याचे श्री.कुलकर्णी यांनी सांगितले.

सावकारांच्या तपासणीला २७ डिसेंबरची डेडलाईन
शहर पोलीसांनी नोंदणीकृत सावकारांचे कारनामे उघड केल्यानंतर आता उपनिबंधक कार्यालयही अक्शन मोडवर आले आहे. जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी सर्व तालुक्यातील अधिकार्यांना त्यांच्या तालुक्यातील नोंदणीकृत सावकारांची तात्काळ तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीचा अहवाल दि. २७ डिसेंबरपर्यंत जिल्हा कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरील अधिकारी चांगलेच कामाला लागले आहेत.