Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रिलायन्सच्या महाप्रकल्पाची जागा बदलणार; पूर्णगडऐवजी वाटद-कळझोंडीचा पर्याय

रिलायन्सच्या महाप्रकल्पाची जागा बदलणार; पूर्णगडऐवजी वाटद-कळझोंडीचा पर्याय

रत्नागिरी:- कोकणातील औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या प्रस्तावित रिलायन्स ऊर्जा प्रकल्पाबाबत महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. सुरुवातीला पूर्णगड परिसरात प्रस्तावित असलेल्या 7,200 मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी आता वाटद-कळझोंडी परिसराचा पर्याय विचाराधीन असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भूसंपादनाशी संबंधित काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे नव्या जागेची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पासाठी वाटद परिसरात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केली होती. मात्र, या प्रक्रियेशी संबंधित मोबदल्याचे काही प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य वाद आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होणारा विलंब टाळण्यासाठी पर्यायी जागांचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

रिलायन्स समूहाच्या प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाकडे राज्यातील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक गुंतवणुकांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. कोकणातील ऊर्जा विकास आराखड्यात या प्रकल्पाला विशेष महत्त्व असून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोकणात विविध ऊर्जा प्रकल्पांद्वारे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक प्रस्तावित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू परिसरातील प्रकल्प तसेच सिंधुदुर्गातील देवगड परिसरातील ऊर्जा प्रकल्पांमुळे या भागातील औद्योगिक विकासाला वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत रिलायन्सच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी अंतिमतः कोणती जागा निश्चित होते, याकडे स्थानिक नागरिक, शेतकरी, उद्योग क्षेत्र आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

राजकीय व आर्थिक घडामोडींना वेग

प्रकल्पाच्या जागेबाबत अद्याप अधिकृत अंतिम घोषणा झालेली नसली, तरी वाटद-कळझोंडी परिसराचा पर्याय चर्चेत आल्याने पूर्णगड आणि परिसरातील राजकीय व आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. आगामी काळात शासन, प्रशासन आणि कंपनीकडून होणाऱ्या निर्णयांवर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.