संशयितांची संख्या तीन वर; मुख्य आरोपीवर बलात्काराचा गुन्हा
चिपळूण:- मुंबई मालाड येथील एजाज कुरेशी खून प्रकरणात चिपळूण पोलिसांनी तिसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या ३ झाली आहे. सागर संतोष बिरीत (३२, रा. रेहळे भागाडी, चिपळूण) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
रामपूर येथील एका आंबा बागेत काही दिवसांपूर्वी अर्धवट जळालेली मानवी हाडे सापडली होती. चिपळूण पोलिसांनी कौशल्याने तपास केला. वैद्यकीय अहवालात ती हाडे मानवी असल्याचे स्पष्ट झाले, तसेच घटनास्थळी सापडलेली अंगठी आणि दात यावरून हा घातपात असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी जमिनीच्या मालकी हक्कावरून तपासाची चक्रे फिरवली आणि मुख्य संशयित विशाल खोडदेकर याच्यापर्यंत पोहोचले. तपासादरम्यान, विशाल खोडदेकर आणि त्याच्या मैत्रिणीने मिळून मालाड येथील एजाज कुरेशी यांचा खून करून मृतदेह रामपूर येथील स्वतःच्या जागेत आणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो जाळला होता.
या गुन्ह्यात मृतदेह जाळण्यासाठी विशालला मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सागर बिरीत याला अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
चार महिन्यांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल
खून प्रकरणात अडकलेला मुख्य संशयित आरोपी विशाल खोडदेकर याच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार आणि फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर चार महिन्यांपूर्वी सावर्डे पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावर्डे पोलिस चार महिन्यांपासून त्याच्या शोधात होते. सद्यःस्थितीत तो खून प्रकरणात चिपळूण पोलिसांच्या कोठडीत आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर सावर्डे पोलिस त्याचा ताबा घेणार आहेत.









