Monday, August 17, 2026
spot_img
Home राजकीय रामदास आठवले यांची अभिजीत दीपकेंना पक्षात येण्याची ऑफर

रामदास आठवले यांची अभिजीत दीपकेंना पक्षात येण्याची ऑफर

चिपळूण:- तरुणांच्या साथीने आंदोलन करणारे युवा अभिजीत दीपके यांनी आमच्या पक्षात यावे अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

रविवारी नामदार आठवले चिपळूण दौऱ्यावर आहेत. आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर खेर्डी मधील एका हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

आठवले यांनी दीपके यांच्या आंदोलनावर भाष्य केले. जंतर-मंतर वरील आंदोलन शांततापूर्ण व्हायला हवे होते मात्र तसे घडले नाही. आता दीपके यांनी आठवले गटात प्रवेश करावा अशी त्यांना ऑफर देतो असे आठवले म्हणाले. दीपके यांनी आपल्या पक्षात प्रवेश केल्यानंतरही आंदोलन चालू ठेवण्यास आपली मान्यता राहील का? या प्रश्नावर आठवले म्हणाले, की अटी आणि शर्तीवर त्यांना आम्ही प्रवेश देऊ..

दलित समाजातील तरुणांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोकणचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे असे मत त्यांनी नोंदविले.