Tuesday, September 29, 2026
spot_img
Home राजकीय जिल्हा नियोजनच्या बैठकीत आ. भास्कर जाधवांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी

जिल्हा नियोजनच्या बैठकीत आ. भास्कर जाधवांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी

रत्नागिरी:- जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांच्या आक्रमक रुपाने सत्ताधाऱ्यांना योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन द्यावे लागले. विरोधी पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या भास्कर जाधव यांनी निधी वाटपातील भेदभाव, बैठकांमधील दिरंगाई आणि प्रशासकीय कारभारावर बोट ठेवत  सत्ताधाऱ्यांना जोरदार कोंडीत पकडले. पुरावे आणि आकडेवारीनिशी केलेल्या या हल्ल्यामुळे आजची बैठक सत्ताधाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाची ठरली.

बैठक सुरू होताच आमदार जाधव यांनी निधी वाटपातील पक्षपाताचा मुद्दा उपस्थित केला. गुहागर मतदारसंघात आमदारांपेक्षा लोकप्रतिनिधी किंवा सदस्य नसलेल्या व्यक्तींच्या पत्रावर चारपट निधी मंजूर केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर, दुसऱ्या मतदारसंघातील व्यक्तींनी सुचवलेल्या कामांना नियोजन मंडळ मंजुरी देत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. एका माजी आमदाराच्या शिफारशीवर निधी दिला जात असल्याने संतापलेल्या जाधव यांनी, “जर एका माजी आमदाराच्या पत्रावर निधी देणार असाल, तर जिल्ह्यातील सर्वच माजी आमदारांच्या पत्रांवर निधी द्या,” असा थेट सवाल केला. या थेट प्रहारानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आणि यापुढे असे चुकीचे निर्णय होणार नाहीत, अशी ग्वाही द्यावी लागली.

नियोजन मंडळाच्या बैठका घेण्यातील दिरंगाईवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या वर्षातील पहिली बैठक १२ फेब्रुवारी रोजी झाली होती. वर्षातून किमान चार बैठका होणे अपेक्षित असताना तब्बल आठ महिन्यांनंतर दुसरी बैठक घेतली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळेच आपल्या मतदारसंघावर अन्याय केला जात आहे का, असा सवाल करत त्यांनी निधी वाटपात राजकीय भेदभाव न करता सर्व मतदारसंघांना समान न्याय देण्याची मागणी केली.

आपल्या आक्रमक भूमिकेत जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव बैठकीत मांडला. याशिवाय, गुहागर मतदारसंघात त्यांच्या परस्पर शासकीय कार्यक्रम आयोजित करणाऱ्या प्रशासनालाही त्यांनी कडक इशारा दिला. “तुमच्या सोयीनुसार इतरत्र काहीही करा, पण माझ्या मतदारसंघात असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी ताकीद दिली.