रत्नागिरी:- शहरातील रामआळी येथील कापड्याचे दुकान फोडून रोख रक्कमेसह ३ लाख १९ हजार ६९९ रुपयांचे कपडे लांबविणाऱ्या राजस्थानमधील तिघांच्या टोळीतील एकाच्या मुसक्या आवळण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांना यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या एकाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
चोरी झाल्याची घटना दि.१५ मे रोजी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
रामआळी येथे कमलेश गुंदेजा यांचे कॉर्नर स्टाईल कापडाचे दुकान आहे. या दुकानात अज्ञात चोरटयानी टेरेसवरुन येवून लोखंडी ग्रील उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील २४ हजारांची रोख रक्कम, १ लाख २३ हजार ९३८ रुपयांचे ६० शर्टस, ५६ हजार ४७० रुपयांच्या ३० जीन्स, ४८ हजार ९७५ रुपयांच्या ट्राउझर, ४० हजार ७७६ रुपयांच्या टी शर्ट, २० हजार रुपयांच्या ब्लेझर जॅकेट, ४२ हजार रुपयांच्या सिल्वर कॉईन, ८४० रुपयांची चांदीची दोन नाणी असा एकूण ३ लाख १९ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. हि घटना दि. १५ मे रोजी सकाळी उघड झाली होती.कमलेश गुंदेचा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात शहर पोलीसांनी भादविकलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता.
या चोरीच्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी स्वत:कडे घेतला होता. शहर पोलीसांच्या डिबी स्कोडच्या सहकार्याने त्यांनी मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे टोळीचा शोध सुरु केला होता. त्यानंतर राजस्थान येथे अशा चोर्या करणारी टोळी असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले होते. त्यानंतर डिबीची एक टिम राजस्थान येथे गेली होती. यावेळी टोळीतील एकाला पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.उर्वरित दोघे लवकरच पोलीसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाने चोरीची कबुली पोलीसांकडे दिली आहे. त्यामुळे या टोळीकडून शहरातील अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे.