रत्नागिरी:- दिवसेंदिवस हायटेक होणार्या तंत्रज्ञानप्रमाणे रत्नागिरी पोलिसांनी देखील आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे ठरविले आहे. महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणे, गुन्हे घडण्याच्या संभाव्य जागा, तसेच रत्नागिरीतील इतर परिसरात अधिक प्रभावीपणे गस्त व्हावी म्हणून गस्तीवरील पोलिसांना आता क्यूआर कोड स्कॅनिंग करावे लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात ५०४ तर रत्नागिरी शहरात ८४ पॉईंट निश्चित करण्यात आले असून तेथे क्यूआर कोड चिकटविण्यात आले आहेत.
पेट्रोलिंगमध्ये होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी आणि पोलिस गस्तीवर आहेत हे कळावे यासाठी हि पद्धत सुरु करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.करोनामुळे लॉकडाउन असल्याने रत्नागिरीतील रस्त्यावरील गुन्हे काही प्रमाणात नियंत्रणात आले होते. मात्र, लॉकडाउन शिथिल होताच पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्यावतीने पुन्हा पायी तसेच दुचाकी, चारचाकी वाहनातून गस्तीला प्राधान्य दिली जात आहे. बीट मार्शल, तसेच पोलिस ठाण्यातील इतर अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यामार्फत पेट्रोलिंग केली जाते का? पोलिसांमार्फत गस्तीमध्ये टाळाटाळ होत नाही ना, हे जाणून घेण्यासाठी नवीन क्यू आर कोड प्रणाली विकसीत केली आहे. जिल्ह्यात हा प्रयोग राबविण्यात येत असून महत्त्वाच्या ठिकाणी क्यू आर कोड चिकटविण्यात आले आहेत. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आपल्या मोबाइलमधील विशेष ॲपद्वारे हा क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्याने गस्त केल्याचे वरिष्ठ अधिकार्यांना कळेल. तसेच यादरम्यान या ठिकाणी काही घडल्यास त्याची जबाबदारी गस्त घातलेल्या पोलिसाची असेल.सध्या सकाळी गोपनिय विभागाकडून पुतळे तसेच महत्वाच्या ठिकाणांची पहाणी केली जाते. त्यानंतर पोलीसांच्या विविध शाखांमार्फत गस्त घातली जाते. आता या सर्व गस्त टप्प्या-टप्प्याने घालण्यात येणार आहे. ज्या भागात गुन्हे घडतात किंवा गुन्हे घडण्याची शक्यता असते, अशा ठिकाणची गस्त वाढविण्यात येणार आहे. क्यूआर कोड पद्धतीची गस्त कोकणात प्रथमच रत्नागिरीत सुरु करण्यात येणार आहे.









