रत्नागिरी:- राज्याचा उद्योग विभाग देशात पहिल्यांदाच पाच ठिकाणी कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करत आहे. यामध्ये चार प्रमुख केंद्रांचा समावेश असेल. त्यामध्ये नमो अभियांत्रिकी, नमो ऑटोमोबाईल, नमो वस्त्रोद्योग आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र. ही केंद्रे नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच सुरू होतील. याशिवाय, उद्योग विभागाने आपल्याच ताकदीवर ‘नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याची घोषणा पंधरा दिवसांत केली जाईल, अशी माहितीही उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
मराठी भाषेच्या प्रचारासाठी मराठी भाषा विभागातर्फे 'नमो मराठी अभियान' सुरू करण्यात येत आहे. या एक वर्षाच्या अभियानांतर्गत ७५ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंच आणि ७५ देशांतर्गत मराठी मंडळे स्थापन केली जातील. लंडनमध्ये उभारले जात असलेले छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र या सर्व मंचांना जोडले जाईल आणि तेथून त्यांच्या कार्याचे संचालन होईल असे ना. सामंत यांनी सांगितले. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग लावण्याच्या घटनेचा ना. सामंत यांनी तीव्र निषेध केला. "मीनाताई राज्याच्या 'माँसाहेब' होत्या. केवळ ठाकरे सेना नव्हे, तर आम्हीही या घटनेचा निषेध करतो," असे ते म्हणाले. 'सामना' वृत्तपत्रावर टीका करताना ते म्हणाले की, "आता सामना कोण वाचतो? जेव्हा सरकारकडून जाहिराती चालतात, तेव्हा आम्ही संविधानिक असतो, पण इतर वेळी नाही, या भूमिकेची आम्ही दखल घेत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याची भूमिका असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना मोठा पक्ष असल्यामुळे मित्रपक्षांना समाधानकारक जागा दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. भाजप ज्या ठिकाणी मोठा पक्ष असेल, तिथे त्यांच्या भूमिकेनुसार जागावाटप होईल, पण रत्नागिरीत आम्हीच मोठा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला.









