रत्नागिरीः– राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या भरारी पथकाकडून गावठी दारुवरील कारवाईची मोहीम सुरुच आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या दापोलीतील दाभोळ-भंडारवाडा येथे छापा टाकून केलेल्या कारवाईत चौघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार अटकेची कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारु विक्री करणार्यांवर कारवाई करतानाच हातभट्ट्याही उद्धवस्त केल्या जात आहेत. अशा कारवायांवर प्रभारी अधिक्षक डॉ. बी. एच. तडवी लक्ष ठेवून आहेत. त्याचवेळी उपअधिक्षक व्ही. व्ही. वैद्य स्वतः या अशा कारवाईंमध्ये भाग घेत आहेत. आता जिल्ह्याच्या सीमेवर एका दारु धंद्यावर कारवाई करण्यात आली. निरीक्षक शरद जाधव, जवान निनाद सुर्वे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.राज्य उत्पादन शुल्कच्या या कारवाईत संतोष पांडुरंग शेट्ये (वय 44), संदेश धोंडू कद्रेकर(वय 49), पुष्कराज नारायण मूरकर(वय 67), विकास नागेश तोडणकर (वय 53, सर्व रा. दाभोळ – भंडारवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून गावठी हातभट्टीची दारु सुद्धा जप्त करण्यात आली आहे.