पोलिसांच्या कारवाईत १० जनावरांची सुटका
पाचल:- राजापूरहून भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूर आणि निपाणीच्या दिशेने होणारी जनावरांची अवैध वाहतूक वैभववाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई करत उधळून लावली आहे. या धडक कारवाईत १० जनावरांची सुटका करण्यात आली असून, दोन टेम्पोसह एकूण सात जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
राजापूरहून भुईबावडा घाटातून गुरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची गुप्त माहिती गोरक्षक मंगेश पडवळ यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घाटात नाकेबंदी केली असता, दोन संशयित टेम्पो अडवण्यात आले. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी ५ अशी एकूण १० जनावरे दाटीवाटीने आणि परवान्याशिवाय कत्तलीसाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मंदार संजय पाटणकर, महंमदअली दाऊद काझी, विनायक मोहन भोईटे, वासिम सोलापुरे, शब्बीर भैरी, नवाझ आणि सर्जेराव सदाशिव सावंत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील पुढील तपास करत आहेत.









