Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी प्रतिबंधीत पानमसाला, तंबाखू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

प्रतिबंधीत पानमसाला, तंबाखू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

राजापुरात ७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापूर:- राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली फाट्याजवळ नाटे सागरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शासनाने जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधीत केलेला विमल पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास मौजे धाऊलवल्ली फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी मारुती बापू कोकणे (वय ३७, मूळ रा. सांगली, सध्या रा. रत्नागिरी) हा त्याच्या ह्युंदाई व्हेन्यू गाडीतून (क्र. MH 08 CB 3303) प्रतिबंधीत मालाची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

​पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ​ह्युंदाई व्हेन्यू गाडी, ३९,२०४ रुपये किमतीचा​ विमल पानमसाला, ४,३५६ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू एकूण ७,९३,५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय शिवाजी पाटील (पोलीस कॉन्स्टेबल, सागरी पोलीस ठाणे नाटे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​महाराष्ट्र शासनाने १५ जुलै २०२० च्या अधिसूचनेनुसार राज्यात पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.