राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातीर्थ तीठा येथे गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव टोयोटा हॅलिक्स कारने पुढे जाणाऱ्या किआ सेल्टॉस कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डॉक्टरसह तिघेजण जखमी झाले असून, अपघात घडवल्यानंतर आरोपी चालक जखमींना मदत न करताच घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. सल्वीन फरदीनंड मेंडीस (वय ३५) हे आपल्या किआ सेल्टॉस (MH 04 MA 2698) कारने मुंबईच्या दिशेने जात होते. ९ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांची कार हातीवले टोलनाक्यापुढे असलेल्या गंगातीर्थ तीठा येथे आली असता, पाठीमागून अत्यंत वेगाने आलेल्या टोयोटा हॅलिक्स (MH 04 LB 3508) कारने त्यांच्या गाडीला भीषण धडक दिली.
या अपघातात किआ सेल्टॉस कारमधील डॉ. सल्वीन मेंडीस (वय ३५), रिंकी सल्वीन मेंडीस (वय ३१), पुनम प्रणव माने (वय २८) हे तीघे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालक जय जॉर्ज फर्नांडीस (वय ४५, रा. कुर्ला, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने त्याचे वाहन हयगयीने आणि अतिवेगात चालवून हा अपघात घडवला. विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याऐवजी आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
राजापूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ (अ)(ब), १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ८३/२०२६ नुसार दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









