Saturday, July 18, 2026
spot_img
Home राजकीय राजकारणात काहीही घडू शकते, दीड महिन्यात चित्र स्पष्ट होईल: सुनील तटकरे

राजकारणात काहीही घडू शकते, दीड महिन्यात चित्र स्पष्ट होईल: सुनील तटकरे

रत्नागिरी:- “सध्या आमचे संपूर्ण लक्ष संसदेच्या अधिवेशनावर आणि त्यामध्ये मांडल्या जाणाऱ्या बिलांवर आहे. पुढच्या दीड महिन्यात काय घडामोडी घडतील, हे काळाच्या उदरात दडलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करतील, त्यानंतरच काही स्पष्ट होईल. राजकारण हे प्रवाही असते आणि त्यात काहीही घडू शकते असे खा. तटकरे यांनी सांगितले.

राज्यातील शिंदे सरकारमध्ये अर्थखात्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, “एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळे ते इतर पक्षाला महत्त्वाचे खाते देऊ नये असे म्हणतील, असे मला वाटत नाही. आमचे त्यांच्याशी संबंध सौहार्दाचे आहेत. अर्थखाते आम्हाला मिळावे, ही आमची मागणी आहे आणि याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.

पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, अजितदादा हयात असताना त्यांच्या नियोजनाप्रमाणे विलीनीकरणाची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात होती. दादांनी मला त्याबाबतची माहिती दिली होती आणि ठरलेला फॉर्म्युलाही मला ज्ञात होता. मात्र, सध्या आमच्या पक्षात विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही.

खासदार म्हणून मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे सांगत त्यांनी राजकीय चर्चेच्या चर्चा फेटाळल्या. तसेच, पार्थ पवार यांच्या मुख्यमंत्री भेटीबाबत विचारले असता, “ते भेटू शकतात, यात वावगे काहीच नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.