चिपळूण नागावे येथील घटना
चिपळूण:- नागावे येथील एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला खुनाची सुपारी देऊन संपविण्याचा कट रचल्याप्रकरणी आणि जातीवाचक द्वेषातून छळ केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी गावातील सहा जणांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी प्रकाश बाबू चिपळूणकर (वय ५८), रा. नागावे, हे एका शासकीय विभागात नोकरीस असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. नागावे येथील ग्रामदेवता श्री सुकाई देवी मंदिरासमोर आरोपींच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी एक बेकायदेशीर चौथरा बांधला होता. ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्याने ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही चौथरा न काढल्याने अखेर तो ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मिळून हटवला. या कारवाईत फिर्यादी चिपळूणकर यांचा कोणताही सहभाग नसताना, आरोपींनी केवळ द्वेषापोटी त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटा तक्रार अर्ज देऊन त्यांची बदनामी केली.
तक्रारीनुसार, हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. ३१ डिसेंबर २०२५ रोजी आरोपींनी फिर्यादीचे मित्र शामराव भोसले यांना फोन करून “फिर्यादीला गाडीखाली चिरडून मारण्यासाठी एखादा माणूस गाठून द्या” अशी मागणी करत खुनाचा कट रचला होता.
तसेच, फिर्यादी यांनी आरोपींच्या बिअर बार आणि परमिट रूमबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. याचा राग मनात धरून, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपींनी फिर्यादीला गाठून “माहिती अधिकाराचे पत्र मागे घे, अन्यथा टोकाचे पाऊल उचलून तुझा शेवट करावा लागेल” अशी धमकी दिली.
फिर्यादी हे अनुसूचित जातीचे असल्याचे माहित असूनही त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरेश राजाराम पालांडे, सुचिंद चंद्रकांत पालांडे, घनश्याम राजाराम पालांडे, चंद्रकांत शंकर पालांडे, शिवाजी दत्ताराम पालांडे, श्रीकांत शंकर पालांडे (सर्व रा. नागावे, ता. पालांडे) या ६ जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६१, ३५१(२)(३), ३(५) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(२), (व्ही.ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी करत आहेत.









