रांबाडे खून प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील कोंड्ये रांबाडेवाडी येथून बेपत्ता झालेल्या वैशाली चंद्रकांत रांबाडे खून प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.२९ जुलै रोजी वैशाली हिचा खून झाला होता.

लांजा कोंडये रांबाडेवाडी येथील वैशाली रांबाडे खून प्रकरणाचा उलगडा अडीच महिन्यांनंतर झाला होता. या खून प्रकरणात कोंड्ये रांबाडेवाडी येथील राजेंद्र गोविंद गुरव याने वैशाली रांबाडे हिचा शनिवार दि. 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कुवे येथील जंगलमय भागात खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
दरम्यान, आरोपी राजेंद्र गुरव आणि मृत वैशाली रांबाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यामुळे वैशाली हिने राजेंद्र याच्याकडे वारंवार पैशाचा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळूनच राजेंद्र याने वैशाली हिचा काटा काढल्याचे उघड झाले.
कोंडये रांबाडेवाडी येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे (48 वर्षे) ही शनिवार दि. 29 जुलै 2023 रोजी कुवे येथे डॉक्टरकडे जातो असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिचे पती चंद्रकांत रांबाडे हे मुंबईहून गावी आले. त्यानंतर त्यांनी रविवार दि. 30 जुलै रोजी लांजा पोलीस ठाण्यात वैशाली रांबाडे ही बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर लांजा पोलिसांकडून या बेपत्ता वैशाली रांबाडे यांचा शोध सुरू होता.
याबाबत बेपत्ता वैशाली रांबाडे हिचा पती चंद्रकांत रांबाडे यांनी बुधवार दि.11 ऑक्टोबर रोजी वैशाली रांबाडे हिच्या बेपत्ता प्रकरणी कोंडये रांबाडेवाडी येथीलच राजेंद्र गोविंद गुरव यानेच तिला फुस लावून पळून नेल्याची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र गुरव याच्यावर भा.द.वि. कलम 365, 366 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. गुरुवार दि. 12 ऑक्टोबर रोजी त्याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. याप्रकरणी लांजा पोलीस तपास करत असताना या घटनेत आरोपी राजेंद्र गुरव याने आपणच वैशाली रांबाडेचा खून केल्याचे तपासात कबूल केले. लांजा शहरानजीकच्या कुवे येथील जंगलमय भागात आपण तिचा खून केल्याची त्याने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणात राजेंद्र गुरव याचे विरोधात भा. द. वि. क 302, 364, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या संशयिय आरोपी न्यायालयीन कोठडीत असून त्याने जमिना मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाल्यात अर्ज केला होता. यावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. फिर्यादी चंद्रकांत रांबाडे यांच्यावतीने ऍड. अमित आठवले यांनी न्यायालयात जोरदार बाजू मांडली. न्यायालयाने राजेंद्र गुरव यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.