रस्त्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; महिला जखमी

मंडणगड:- तालुक्यातील गोठे येथे रस्ता वापराच्या क्षुल्लक वादातून एका कुटुंबावर घरात घुसून लोखंडी पाईप आणि लाकडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांची बहीण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रराज शांताराम जाधव (वय ३९) हे सध्या नालासोपारा येथे राहतात, मात्र घटनेच्या वेळी ते आपल्या गोठे (ता. मंडणगड) येथील मूळ गावी आले होते. बुधवार, दिनांक ८ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गावातील पाखाडीवरून (रस्त्यावरून) गाडी नेऊ न दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी जाधव यांच्या घरात प्रवेश केला.

​आरोपी विकास गमरे, त्यांचा मुलगा सुनील गमरे आणि रौनक मर्चेडे यांनी फिर्यादी प्रराज जाधव यांना लोखंडी चौकोनी पाईप आणि लाकडी काठीने पाठीवर व हातापायावर बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची दमदाटीही केली.
​या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादीची बहीण शुक्रांती शांताराम जाधव (वय ४२) यांच्या डोक्यात आरोपी सुनील गमरे याने लोखंडी पाईप मारला. यामध्ये त्यांच्या डोळ्याच्या भुवईजवळ गंभीर जखम झाली आहे. तसेच, फिर्यादीच्या वृद्ध आईलाही आरोपींनी ढकलून दिल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी विकास गणपत गमरे (वय ५२ वर्षे), सुनील विकास गमरे (वय २३ वर्षे), रौनक राजन मर्चेडे (वय २२ वर्षे) या तीन संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३३३, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.