Sunday, May 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरी

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरी

चिपळूण:- दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करत दोघांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलोरे आणि पोफळी परिसरात काही अंतराच्या फरकाने घडलेल्या या लागोपाठ दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे आणि खळबळीचे वातावरण पसरले आहे.

अलोरे-शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना पोफळी येथील पवारवाडी परिसरात घडली. येथे एका इसमाला चिपळूणला जाण्याचा रस्ता विचारत संशयितांनी त्याच्याशी संवाद साधला. रस्ता सांगत असतानाच अचानक त्या तिघांनी त्याला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्याकडील मोबाईल हिसकावून दुचाकीवरून पसार झाले.

हा प्रकार ताजा असतानाच, काही वेळातच शिरगाव येथील दत्त मंदिर परिसरात दुसरी घटना घडली. येथे एक महिला देवदर्शनासाठी पायी जात असताना या तिघांनी तिला गाठले. तिला देखील चिपळूणकडे जाणारा रस्ता विचारण्यात आला. महिला काही समजण्याच्या आतच संशयितांनी तिच्या तोंडावर फटका मारला आणि तिच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.

२० मे रोजी घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे अलोरे-पोफळी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी काळ्या रंगाची ‘होंडा युनिकॉर्न’ होती आणि त्या दुचाकीच्या डाव्या बाजूला पांढर्‍या रंगाची प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती.

या दोन्ही घटनेची गांभीर्याने दखल घेत शिरगाव पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयास्पद दुचाकीच्या वर्णनावरून भामट्यांचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला आहे.