Friday, September 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीसह कोकणात पुढील ५ दिवसांत हवामानात बदल

रत्नागिरीसह कोकणात पुढील ५ दिवसांत हवामानात बदल

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

रत्नागिरी:- भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण विभागासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरुवातीचे दोन दिवस हवामान शांत असणार असून, १२ सप्टेंबरपासून हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या सर्वच जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. या काळात नागरिकांना कोणताही मोठा इशार देण्यात आलेला नाही. शनिवार, १२ सप्टेंबरपासून कोकणातील हवामानात तीव्र बदल पाहायला मिळतील. रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

रविवार, १३ सप्टेंबर आणि सोमवार, १४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी/तास) यांसह हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १३ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक वाढून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आह. वादळाच्या वेळी उघड्यावर काम करणे, उंच झाडांखाली वा धातूच्या वस्तूंच्या जवळ आश्रय घेणे टाळावे. विजेची उपकरणे प्लगवरून काढून ठेवावीत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तयार झालेल्या शेतमालाची लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी काढणी करावी. वादळ आणि पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून साठवलेला माल सुरक्षित ठिकाणी हलवावा व शेतात पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल याची काळजी घ्यावी.किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी व किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी.