रत्नागिरीतील तरुण ठरतायत हनी ट्रॅपचे बळी; सोशल मीडियाच्या माध्यमातून होतेय फसवणूक

रत्नागिरी:- प्रथम फेसबुक वरून एका तरुणीच्या प्रोफाईल वरून फ्रेंड रिक्वेस्ट येते…नंतर चॅटिंग होते…व्हॉट्सअ‍ॅप नंबर मागीलता जातो…व्हिडीओ कॉलिंग केले जाते…मग अश्लील वर्तणूक केली जाते…आणि मग या सर्वांचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून समाज माध्यमावर सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. रत्नागिरीत अशा घटना आता वाढू लागल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. फेसबुक, मॅसेंजर व व्हॉट्सअ‍ॅप या समाज माध्यमावर बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाज माध्यमावर बदनाम करू, अशा पद्धतीने ‘हनी ट्रॅप’चे प्रकार सध्या रत्नागिरीत वाढले असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

रत्नागिरीतील एका तरुणाला दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावर एका सुंदर मुलीने हॅलो, हाय असा संदेश पाठवला. मुलगी सुंदर दिसल्याने मुलगाही तिच्या जाळय़ात अलगद अडकला. त्यानेही तिला उत्तर दिले. मुलाकडून प्रतिसाद मिळाल्याचे बघून मुलीने थेट त्याचे भ्रमणध्वनीवर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधला. दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर काही वेळातच मुलाच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मध्ये एका सुंदर मुलीसोबतचे अश्लील चित्रण पाठवण्यात आले. त्यामध्ये सुंदर मुलीसोबत या मुलाचेही संगणकावर तयार केलेले अर्धनग्न व्हिडीओ होते. सोबत बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाज माध्यमावर बदनाम करू अशी धमकी देखील या तरुणाला दिली गेल्याचे बोलले जात आहे. सदर अश्लील छायाचित्रण बघून तो तरुण घाबरला, गोंधळला, मात्र स्वत:ला सावरत त्याने घडलेला प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. मित्रांनी त्याला धीर देत पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे.

समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करा
याचसोबत रत्नागिरीत अशा पद्धतीने अनेकांना ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून ‘ब्लॅकमेलिंग’ केल्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा, स्वत:चे फेसबुक प्रोफाईल लॉक करून ठेवावी, अनोळखी व्यक्तींना मॅसेंजरवर संवाद साधू नका, असे आवाहन पोलिसांच्या वतीने वारंवार करण्यात येतंय.