पंचतारांकित हॉटेलसाठी १०० कोटी; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये ना. सामंत यांची माहिती
रत्नागिरी:- कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ च्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल २ हजार १५९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटींच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.
जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये जिल्ह्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला बळ देण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये एक्सप्रेस ग्रुपची १०० कोटींची गुंतवणूक आहे. विमानतळापासून २ किमी, शहरापासून ३ किमी आणि समुद्रापासून अवघ्या १ किमी अंतरावर एमआयडीसीच्या जागेत एक्सप्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे. जयगड येथे महिंद्रांचे फाईव्ह स्टार हॉटेल उभे राहणंार आहे. जयगड येथे उभारण्यात येत असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हॉटेलचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘एटीआर’ प्रवासी विमान उड्डाण घेईल अशी माहिती यावेळी ना. सामंत यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत २,१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू.
जिल्ह्यात रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा यावेळी करण्यात आली्. येत्या ७, ८ आणि ९ तारखेला जिल्ह्यात स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होत असून, यामुळे किमान १० ते १२ हजार स्थानिकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी ना. सामंत यांनी दिली. निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे नव्या प्रदूषण विरहित एमआयडीसी उभारल्या जात आहेत अशी माहिती यावेळी ना. सामंत यांनी दिली.
‘मिलाप’ ॲप आणि ‘मैत्री’ पोर्टलद्वारे पारदर्शक सेवा
उद्योगांसाठी एमआयडीसीची जागा मिळवण्यासाठी ‘मिलाप’ ॲप सुरू करण्यात आले असून सोमवारी वैध अर्ज केल्यास पुढच्या सोमवारी घरबसल्या थेट ऑफर लेटर मिळेल. तसेच ‘मैत्री’ पोर्टलवर अर्ज केल्यास ३० दिवसांत दाखला मिळणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास अधिकार आयुक्तांकडे जाऊन पुढील ८ दिवसांत मंजुरी दिली जाते. आज पर्यंत महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांत 1837 गुंतवणूक करारांद्वारे 82655 कोटींची गुंतवणूक झाली असून, 1,55,389 जणांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे. आगामी कालावधीमध्ये उर्वरीत जिल्ह्यातील जिल्हा गुंतवणुक करार परिषदांचे आयोजन प्रस्तावित असून, त्याद्वारेही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन युवक व युवतींना फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत असे ना. सामंत यांनी सांगितले.









