Monday, August 31, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आठ वाहनांवर कारवाई

रत्नागिरी तालुक्यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आठ वाहनांवर कारवाई

रत्नागिरी शहर, ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आठ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे

रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने मोटार, रिक्षा व दुचाकी पार्क करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध रत्नागिरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील जयस्तंभ, रहाटाघर, आठवडा बाजार, रेल्वेस्टेशन फाटा, कारवांचीवाडी फाटा, खेडशी, तसेच जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा ते मिरवणे आणि सह्याद्रीनगर परिसरासह मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आठ वाहनचालकांविरुद्ध शहर, ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शुक्रवार (ता. २८) आणि शनिवार (ता. २९) या दोन दिवसांत सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित वाहनचालकांनी आपल्या ताब्यातील रिक्षा, मोटार व दुचाकी अशा प्रकारे पार्क केल्या होत्या की, त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना अडथळा निर्माण होत होता.
या प्रकरणी महेश अजित भानुशाली (वय ४७, रा. सिद्धिविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी), कल्पेश अरुण राणे (वय ३६, रा. हनुमान नगर, मिरजोळे, रत्नागिरी), योगेश यशवंत शेलार (वय ३४, रा. नेवरे उंबरवाडी, रत्नागिरी), विनोद अशोक शिर्के (वय ४९, रा. करबुडे शिर्केवाडी, रत्नागिरी), संजीवकुमार सुभाषे डोंगरे (वय ३८, रा. सावंत बंगला येथे भाड्याने, श्रीनगर खेडशी, रत्नागिरी), ओकार अशोक पंडित (वय ३१, रा. चाफेरी, आदर्शनगर, रत्नागिरी), जहीर सलीम मापारी (वय ४०, रा. कोडअसुर्डे, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) आणि अनिल जगन्नाथ कावेकर (वय ६१, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जयस्तंभ, रहाटाघर, आठवडा बाजार, रेल्वेस्टेशन फाटा आणि कारवांचीवाडी फाटा या परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीच्या मार्गात वाहने उभी केल्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत खेडशी परिसरातही अशाच प्रकारे वाहन पार्क करण्यात आल्याचे आढळून आले. तर जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडाळा ते मिरवणे, सह्याद्रीनगर परिसर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल अनुप पाटील, आशिष भालेकर, ईशीता वाडावे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल चव्हाण, महिला पोलिस हवालदार सानिया कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल संकेत आटोळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन पवार, दिपाली काळे आणि दिनेश हरचकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींच्या आधारे आठ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून वाहन चालकांना आवाहन..
शहरातील तसेच ग्रामीण भागातील सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेत अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.