रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडोम-कोतवडे रस्त्यावर एका अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही घटना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास घडली. श्रीकृष्ण सोनू मोरे (वय ६५, रा. दांडेआडोम, मांडवकरवाडी) हे दांडेआडोमपासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या कोतवडे रस्त्यावरून आपल्या शेताकडे पायी जात होते. याचवेळी कोतवडेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे श्रीकृष्ण मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मोरे यांना तात्काळ रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री १०:०५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी, मयताचा मुलगा रवींद्र कृष्णा मोरे (वय ४५) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ नुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे (गु.र.क्र. १६९/२०२५). पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.









