Tuesday, October 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत सायबर भामट्यांचा डाव उधळला!

रत्नागिरीत सायबर भामट्यांचा डाव उधळला!

बँक, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकाचे ५ लाख ३८ हजार रुपये परत

रत्नागिरी:- कष्टाने कमावलेला पैसा सायबर भामट्यांनी लुटल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात अखेर यश आले आहे. बँक ऑफ इंडियाच्या तत्परतेमुळे आणि पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या विशेष सहकार्यामुळे एका नागरिकाचे ५ लाख ३८ हजार रुपये परत मिळाले आहेत. या घटनेमुळे सायबर गुन्ह्यांना सामोरे जाणार्‍या नागरिकांना मोठा धीर मिळाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी धीरज या नागरिकाच्या बँक खात्यातून अचानक २५ हजार, त्यानंतर २ लाख आणि पुन्हा २ लाख अशा व्यवहारांसह एकूण सुमारे ५ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम परस्पर डेबिट झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काय करावे सुचले नाही. त्याने मित्र राजेश सोहोनी यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

राजेश सोहोनी यांनी वेळ न घालवता तातडीने बँक ऑफ इंडियाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून खाते फ्रीझ करण्याची विनंती केली. बँकेच्या ऑनलाइन सेवा विभागाने तातडीने कार्यवाही करत खाते फ्रीझ केले. यानंतर १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, येथील गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना येणार्‍या अडचणींचा अनुभव आला. अखेर सायबर क्राईमच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान, राजेश सोहोनी यांचे बँक ऑफ इंडियाच्या जयगड शाखेत जुने खाते असल्याने, त्यावेळचे शाखा मॅनेजर धीरज कुमार यांच्याशी त्यांचे जुने संबंध होते. त्यांनी धीरज कुमार यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यानुसार मुंबईत असलेला धीरज दुसर्‍याच दिवशी रत्नागिरीत दाखल झाला. बँकेत आल्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या प्रियांका कुमारी यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर ऑनलाइन अपलोड करणे आणि सायबर इन्शुरन्सचा अर्ज दाखल करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले.

तथापि, सायबर क्राईम विभागाकडून अपेक्षित पाठपुरावा किंवा प्रतिसादाअभावी अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राजेश सोहोनी यांनी हा प्रश्न उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. उदय सामंत यांच्यासमोर मांडला. पालकमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेत जिल्हा प्रशासन, सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस यंत्रणेच्या सायबर विभागाची संयुक्त बैठक बोलावली. या उच्चस्तरीय बैठकीमुळे प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली. अखेर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक ऑफ इंडियाकडून धीरज याच्या मोबाईलवर तुमचा सायबर इन्शुरन्स मंजूर झाला असून ५,३८,००० रुपये जमा झाले आहेत, असा संदेश आला. मित्राचे कष्टाचे पैसे परत मिळाल्यामुळे या संघर्षाला यश आले आहे. बँक ऑफ इंडियाने दिलेली सायबर इन्शुरन्सची सुविधा आणि संकटकाळात मिळालेली मदत अत्यंत महत्त्वाची ठरली असून, बँकिंग क्षेत्रासह नियामक यंत्रणांनी अशा संरक्षणात्मक सुविधांचा अधिकाधिक प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या यशस्वी लढायात मदत करणार्‍या पालकमंत्री उदय सामंत, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे आभार मानले जात आहेत.