रत्नागिरी:- समुद्रातील बेकायदेशीर एलईडी प्रकाशातील मासेमारी करणाऱ्या नौकाना पकडण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडे गस्ती नौकाच नसल्याने गस्ती पथक हतबल झाले आहे. अशावेळी नवीन गस्ती नौका येईपर्यंत आपल्या दोन नौकांपैकी एक नौका विना मोबदला देण्याची तयारी पारंपारिक शाश्वत मच्छिमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजीत उर्फ छोट्या भाटकर यांनी दर्शवली आहे. अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी पारंपारिक मच्छिमारही गस्ती पथकासोबत येण्यास तयार असल्याचेही अध्यक्षांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदेशीरपणे एलईडी मासेमारी करून पारंपारिक मच्छिमारांच्या हक्काची मासळी पकडली जात आहे. या अवैध मासेमारीसंदर्भात तक्रारी झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे अतिरिक्त सहआयुक्त महेश देवरे, उपायुक्त नागनाथ भादुले यांनी स्वतंत्र पथक गठीत करून नियमित कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी समुद्रात गस्ती नौकेने जावे लागते. अशावेळी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडे गस्ती नौकाच नसल्याने कारवाई होऊ शकलेली नाही. या अडचणीवर पारंपारिक शाश्वत मच्छिमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजीत उर्फ छोट्या भाटकर यांनी गस्ती पथकाच्या नौकेचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. फक्त त्यांना कारवाईची ग्वाही अपेक्षित आहे.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडे असलेली शारदा नावाची गस्ती नौका परत देण्यात आली आहे. या नौकेचा वेग ताशी ९ ते १० नॉटीकल मैल इतका कमी होता. त्याचबरोबर समुद्रातील लाटांच्या माऱ्याने हेलकावे घेणाऱ्या या नौकेमुळे गस्ती पथकातील अधिकारी आणि सहकाऱ्यांना अंगदुखीचा त्रास होवू लागला. त्याचबरोबर या शारदा गस्ती नौकेत बिघाडही निर्माण झाला होता. त्यामुळे ही नौका परत पाठवण्यात आली. त्यानंतर जुनी रामभद्रा गस्ती नौका देण्याबाबत मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाकडून कार्यवाही सुरू झाली होती. परंतु ही नौका फायबरची असल्याने परप्रांतीय अवाढव्य लोखंडी नौकांजवळ जाताना फारच असुरक्षित होते. त्यामुळे दुसऱ्या गस्तीची मागणी करण्यात आली असून त्याबाबत कार्यवाही सुरूही झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात एलईडी मासेमारीसह परवानगी नसलेल्या राज्याच्या समुद्रात पर्ससीन नेट मासेमारी होत आहे. समुद्रात कुठेच मासेमारीची परवानगी नसतानाही अनेक मिनी पर्ससीन नौका मासेमारी करतात. या सर्व अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्यासाठी समुद्रात जाणाऱ्या गस्ती पथकाला आपली मासेमारी नौका मोफत वापरण्यास देण्याची तयारी पारंपारिक शाश्वत मच्छिमार नेते भाटकर यांनी दाखवली आहे.
शासनातर्फे अनाधिकृत मासेमारी रोखण्यासाठी नौका शोधत आहेत खरोखरच जर का माझ्या पारंपरिक शाश्वत मच्छीमारांना न्याय मिळणार असला तर व शंभर टक्के कारवाई होणार असली तर माझ्या या दोन नौकांपैकी एक नौका मी शासनाकडून एकही रुपया न घेता बिना मोबदला माझ्या प्रामाणिक मच्छीमारांसाठी मी द्यायला तयार आहे परंतु शंभर टक्के बेकायदेशीर मासेमारी थापली पाहिजे जेणेकरून माझा सामान्य मच्छीमार जगू शकेल









