रत्नागिरी:- शहरातील मिरकर वाडा येथे मोठी घरफोडी झाली आहे. अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट फोडत अज्ञात चोरट्याने तब्बल आठ लाख ३० हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरकरवाडा येथील अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट फोडत चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याबाबत करिष्मा लियाकत मुल्लानी (29, रा. घरकुल अपार्टमेंट मिरकरवाडा, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिली. मुल्लानी काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या असताना अज्ञाताने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील रोख 30 हजार रुपये, सोन्याचे कंगन, नेकलेस, अंगठी, डूल, मंगळसूत्र असा एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. करिष्मा मुल्लानी घरी परतल्या असता चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.