रत्नागिरीत मच्छी फॅक्टरीतील चालकाकडून डिझेलची चोरी

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजनगर, कोकणनगर आणि मिरकरवाडा जेटी परिसरात सन २०२३ पासून ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत एका मच्छी फॅक्टरीतील चालकाने सुमारे २९ हजार ४४० रुपये किंमतीच्या डिझेलची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फॅक्टरी मालकाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चालक आणि डिझेल खरेदी करणाऱ्या व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीद मोहम्मद हुसेन (५६, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) यांच्या मालकीच्या मच्छी फॅक्टरीतील टेम्पो चालक सुबेदार जगदेव निशाद (वय २४, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. झाडगाव औद्योगिक वसाहत, रत्नागिरी) याने हा प्रकार केला. फिर्यादीनुसार, आरोपी निशाद हा त्यांच्या चार मच्छिमारी बोटींसाठी दर आठवड्याला लागणाऱ्या डिझेलमधील सुमारे ५० लिटर डिझेल चोरत होता आणि ते चोरीचे डिझेल हसन दर्वे (रा. मिरकरवाडा) याला विकत होता.

आतापर्यंत आरोपी निशादने एकूण ४० बॅरलमधील प्रत्येकी ८ लिटरप्रमाणे ३२० लिटर डिझेल फिर्यादीच्या परवानगीशिवाय चोरी करून आरोपी दर्वे याला विकले, ज्याची एकूण किंमत २९ हजार ४४० रुपये आहे. फिर्यादी शाहीद हुसेन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सबेदार जगदेव निशाद आणि हसन दर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.