रत्नागिरीत पुन्हा हेल्मेट सक्ती; मागे बसणाऱ्या व्यक्तिलाही हेल्मेट अत्यावश्यक

हेल्मेट सक्तीची होणार तत्काळ अंमलबजावणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मोटार सायकल अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मोटार अपघातात वाढत्या मृत्यू संख्येला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व दुचाकी चालक आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले असून याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हेल्मेट परिधान न केल्यास एक हजारांचा दंड आणि दुचाकी लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, महामंडळे, महानगरपालीका व सर्व शासकीय आस्थापना तसेच खाजगी आस्थापना यांनी यांच्या आस्थपनेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या सर्व कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकी चालक व मागे बसुन येणाऱ्या व्यक्तीना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ कलम २५० नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरीक्त इतर रस्त्यांवर ५० सी.सी पेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्तीस मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ च्या तरतुदीनुसार अपवाद करण्यात आला आहे.

हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्ती विरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/१७७,२५०(१) नुसार तसेच कलम १९४(३) अन्वये संबंधीत आस्थापना प्रमुख यांचे विरुध्द गुन्हा नोंद करुन त्यांच्याकडून रु. १ हजार दंड तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.