रत्नागिरीत पंधरा दिवसांत 84 पक्षांचा मृत्यू

बर्ड फ्लूचा वाढता धोका, आरोग्य विभाग अलर्ट

रत्नागिरी:- परदेशातील पक्षांचे आगमन झाल्यानंतर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सुरु झाला. रत्नागिरी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात 84 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यातील दापोलीमध्ये आढळलेल्या पाच पक्षांचे तपासणी अहवाल बाधित आले. त्यानंतर विविध ठिकाणी मृत पावलेल्या पक्षांची तपासणी करण्यापेक्षा मृतदेहाची विल्हेवाट लावून परिसरात औषध फवारणीवर भर दिला आहे.

हिवाळ्याच्या तोंडावर महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूने पक्षी आणि काही ठिकाणी कोंबड्या मृत पावल्याचे प्रकार उघडकीस आले. रत्नागिरी जिल्ह्यात कावळे, टिटवी, कबुतरे, चिमणी यांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी पशु विभागाकडे झाल्या आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील कोंबडी विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होेते; परंतु पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यू नसल्याचा प्रचार करतानाच योग्य त्या उपाययोजना करण्यावर भर दिला. दापोली तालुक्यात कावळे मृत झाल्याचा पहीला प्रकार आढळला. ते पक्षी बर्ड फ्ल्यूने मृत पावल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. त्यानंतर संपुर्ण जिल्ह्यात पक्षी मृत होत असल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या. सर्वाधिक मृतांची नोंद दापोली आणि रत्नागिरी तालुक्यात झाली आहे. दापोलीतील अहवाल बाधित आल्यानंतर मृत पक्षांची तपासणी करण्यापेक्षा त्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यावर भर दिला जात आहे. जमिनीत खड्डा खोदून तो व्यवस्थित गाडला जातो. त्या परिसरात औषध फवारणी करुन तो स्वच्छ केला जात आहे.

जिल्ह्यात 700 हून अधिक पोल्ट्री धारक असून त्यांच्याकडे सव्वा आठ लाख पक्षी आहेत. महिन्याला दीड कोटी रुपयांची उलाढाल होते. मृत पक्षांमुळे कोंबड्यांवर परिणाम होणार नाही, यासाठी पशु विभागाकडून पोल्ट्रीधारकांसह चिकन विक्रेत्यांना स्वच्छता ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे शेतकर्‍यांशी संवाद साधून आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोंबड्यांवर बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.