शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कोंड आंबेकरवाडी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फिर्यादी वृद्ध महिलेला दगड मारून दुखापत केल्याप्रकरणी प्रथमेश प्रकाश आंबेकर याच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सकाळी फिर्यादी रूपावती कृष्णा आंबेकर (वय ६४, रा. कोंड आंबेकरवाडी) यांचा नातू विश्वेश दुकानात गेला होता. त्याला घरी बोलावण्यासाठी फिर्यादी यांनी त्यांचा दुसरा नातू सोहमला पाठवले होते. यावेळी शेजारी राहणाऱ्या आरोपीने सोहमला अडवून, “मी त्याला पाठवत नाही,” असे म्हणत शिवीगाळ केली.
काही वेळाने आरोपी मद्यधुंद अवस्थेत फिर्यादीच्या अंगणात आला आणि फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करू लागला. फिर्यादीने त्याला जाब विचारला असता, आरोपी अधिकच चिडला. “तुझा नवरा कुठे आहे? त्याला बाहेर पाठव, त्याला ठार मारतो,” अशी धमकी देत आरोपीने अंगणातील दगड उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकला. हा दगड फिर्यादीच्या पायाला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी ४ जून रोजी दुपारी १२:५१ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी प्रथमेश आंबेकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१ आणि भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.









