रत्नागिरी:- रस्त्यावर रिक्षा मागे घेण्यासारख्या किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकास मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मनिष बळीराम कुवळेकर (रा. चवंडेवठार, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास शिवा ऑप्टिकल जवळ, आठवडा बाजार ते पटवर्धन हायस्कूल दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद मुरलीधर भाटकर (वय ५१, रा. पेट किल्ला कुरणवाडी) हे त्यांच्या नातवाला रियांश सर्वे (वय ८) याला रिक्षाने (क्रमांक MH 08 AV 7453) पटवर्धन हायस्कूलमध्ये सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, पटवर्धन हायस्कूलकडून समोरून एक चारचाकी गाडी (मॅग्ड्रोमा) येत असल्याने त्यांनी आपली रिक्षा सुरक्षिततेसाठी मागे घेतली.
यावेळी फिर्यादी यांच्या रिक्षाच्या मागे आरोपी मनिष कुवळेकर हा स्कुटरवर होता. रिक्षा मागे घेतल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने थेट फिर्यादीवर हल्ला करत हाताच्या ठोशांनी त्यांच्या तोंडावर व डाव्या डोळ्यावर जबर मारहाण केली.
या मारहाणीत मिलिंद भाटकर यांच्या ओठाला गंभीर जखम झाल्याने त्यांना टाके पडले आहेत, तसेच डोळ्यालाही दुखापत झाल्याने त्यांना कमी दिसू लागले आहे. याप्रकरणी १८ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताअधिनियम २०२३ चे कलम ११७(२), ११५(२), ३५२ आणि भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









