चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई हाोनार
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि पदपथांवर (फूटपाथ) उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी व हातगाड्यांवर आज सोीमावर पासून नगरपालिकेची धडक कारवाई सुरू होत आहे. सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार पालिका प्रशासनाने अतिक्रमणमुक्तीचा निर्धार केला असून, संभाव्य विरोध व वादविवाद टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत शहरातील वाढत्या अतिक्रमणांवरून जोरदार चर्चा झाली होती.
नगरसेवक केतन शेट्ये यांचा सवाल: कोकणनगर परिसरातील कारवाईचा संदर्भ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी मुख्य रस्ते, गर्दीची बाजारपेठ आणि फूटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांवर थेट बोट ठेवले व पालिका प्रशासन यावर कधी कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला होता.
यावर उत्तर देताना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सार्वजनिक जागा आणि फूटपाथवरील अतिक्रमणांबाबत पालिका अत्यंत कठोर असल्याचे स्पष्ट केले. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि फूटपाथवरील सर्व अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व खोकी हटवण्याचा एकमुखी निर्णय सभागृहाने घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता उद्यापासून सुरू होत आहे. मोहिमेदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि संभाव्य विरोध मोडून काढता यावा, यासाठी नगरपालिकेने पोलीस प्रशासनाकडे चोख बंदोबस्ताची मागणी केली आहे.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेमुळे शहरातील रस्ते आणि फूटपाथ मोकळा श्वास घेणार असले, तरी या धडक कारवाईच्या इशाऱ्यामुळे अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.









