रत्नागिरी:- वैद्यकीय क्षेत्रातील नियमांच्या संघर्षात आता सामान्य रुग्णांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. होमिओपॅथीच्या पदवीधर डॉक्टरांची नावे मॉडर्न मेडिसिनच्या रजिस्टरमध्ये नोंदवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील आधुनिक वैद्यकशास्त्रज्ञ (एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर डॉक्टर) आक्रमक झाले असून, याच असंतोषातून उद्या गुरुवारी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात कडक वैद्यकीय बंद पुकारण्यात आला आहे.
गेल्या काही काळापासून होमिओपॅथीच्या डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनच्या नोंदणी पुस्तिकेत स्थान देण्याच्या हालचालींवरून वैद्यकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. एम.बी.बी.एस. आणि उच्च पदवीधारक डॉक्टरांच्या राज्य संघटनेने हा विरोध वारंवार शासनापर्यंत पोहोचवला होता. मात्र, राज्य सरकारने या कायदेशीर आणि तांत्रिक आक्षेपांकडे दुर्लक्ष करत होमिओपॅथी डॉक्टरांची नावे नोंदविण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू केली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, या मनमानी निर्णयाविरोधात आय.एम.ए. महाराष्ट्र राज्याने थेट राज्यव्यापी सेवाबंदी आंदोलनाचा कडक पवित्रा घेतला आहे.
राज्य संघटनेच्या या हाकेला संपूर्ण राज्यातून आणि कोकणातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून, रत्नागिरीतील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या म्हणजेच गुरुवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ६ वाजेपासून जिल्ह्यात वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाला तातडीने देण्यात आली आहे.
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे लांब-लांबून उपचारासाठी रत्नागिरीत येणाऱ्या रुग्णांची कोणतीही गैरसोय किंवा परवड होऊ नये, या उद्देशाने आय.एम.ए. रत्नागिरी शाखेने पत्रकार माध्यमांपर्यंत ही बातमी पोहोचवली आहे. आपत्कालीन परिस्थिती वगळता सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, दवाखाने आणि रुग्णालये बंद राहणार असल्याने नागरिकांनी व रुग्णांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन आय.एम.ए. रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. निमाद नाफडे आणि सचिव डॉ. अनघा घाग यांनी केले आहे.









