रत्नागिरी:- तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. तालुक्यात दोन दिवसात अवघे 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून रत्नागिरीकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. यात रत्नागिरी तालुक्यात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले. रत्नागिरी शहर आणि परिसरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला होता. शहराच्या प्रत्येक भागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागल्याने शहरवासीयांची चिंता वाढू लागली होती.
मात्र मागील काही कालावधीपासून कोरोना संक्रमणाचा वेग मंदावल्याचे चित्र असून ही दिलासादायक बाब आहे. मागील दोन दिवसात रत्नागिरी तालुक्यात अवघे 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शुक्रवारी रात्री 8 तर शनिवारी रात्री 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्ण सापडण्याचे घसरलेले प्रमाण रत्नागिरीकरांसाठी निश्चितच दिलसादायक आहे.









